गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीची संचालिका सुधा सुधाकर खडके (वय ६२, रा. गुणे गल्ली, गडहिंग्लज) हिला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील तळेगाव दुर्गावाडी येथून शनिवारी (दि. २२) अटक केली. न्यायालयात हजर केले असता तिची गुरुवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडीत रवानगी झाली. गुन्हा दाखल झाल्यापासून २ वर्षे ३ महिने आणि २६ दिवस ती फरार होती.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत एएस ट्रेडर्सच्या १७ संशयितांना अटक केली आहे. यातील १२ जणांची सुमारे १३ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, त्याची लिलाव प्रक्रिया करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या गुन्ह्यातील संशयित सुधा खडके ही एएस ट्रेडर्सची संचालिका गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होती.
ती गोव्यात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तळेगाव दुर्गावाडी येथून तिला अटक केले. गुन्ह्यातील तिचा सहभाग तपासून तिच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार राजू येडगे, विजय काळे, प्रवीणा पाटील, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.
एएस ट्रेडर्स कंपनीवर नागपुरातही गुन्हा दाखल आहे. नागपूर पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याचा कळंबा कारागृहातून ताबा घेतला होता. चौकशीनंतर त्याला पुन्हा कळंबा कारागृहात सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

