दिवाळीचा चौथा दिवस “लक्ष्मी पूजन”

“लक्ष्मीपूजन”


आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष  लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

        या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे.

        लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेल्या फोटोची सुद्धा पूजा केली जाते. असे सांगतात की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. जिथे स्वच्छता आणि सकारात्मकता आहे तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं.या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे.

संग्रहित माहिती ,

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .

Scroll to Top