कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूरचा साडेचार वर्षांच्या देवराज कृष्णराज नलवडे याने पंधरा किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण करुन इनलाईन स्केटिंगमध्ये नवीन विश्वविक्रम केला. यापूर्वी त्याने साडेदहा किलोमीटर अंतर ३८ मिनिटांत पूर्ण केले होते.
कागलमधील फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या रोडवर पाच वाजून पंधरा मिनिटांनी इनलाईन स्केटिंग या उपक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये देवराज नलवडे याने १५ किलोमीटर अंतर अवघ्या ५१ मिनिटांत पूर्ण केले. त्याला जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते चिल्ड्रन्स बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविले. यावेळी उद्योगपती धीरज समर्थ, कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, आजरा बँकेचे उपाध्यक्ष सुनील मगदूम, उद्योगपती लुनचंद चालेजा, इचलकरंजी पालिकेचे माजी इंजिनिअर बबन खोत, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे पांडुरंग पाटील उपस्थित होते.
