निपाणीत झेंडा बाईक रॅली ठरली लक्षवेधी

निपाणी/प्रतिनिधी

श्रीराम नवमीनिमित्त निपाणी शहरात रविवारी ६ रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या जनजागृतीसाठी श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे शुक्रवारी सायंकाळी भव्य झेंडा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीस युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या रॅलीचा शुभारंभ निलेश पाटील यांच्या हस्ते झाला. रॅलीला राम मंदिर येथून सुरुवात झाली. रॅली नगरपालिका, धर्मवीर संभाजी चौक, निपाणी मेडिकल, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, महादेव मंदिर गांधी चौक, छ. शिवाजी चौक, जोशी गल्ली बेळगाव नाका, खरी कॉर्नर येथून फिरून आल्यानंतर राम मंदिर येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीत महिला व पुरुष भगवे फेटे, टोप्या परिधान करून दुचाकीवर स्वार झाले होते. जयश्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. भगव्या झेंड्यामुळे अवघे शहर भगवेमय झाल्याचे पहावयास मिळाले. स्वागत श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष अॅड. निलेश हत्ती यांनी केले. निपाणी शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रविवारी निघणारी शोभायात्रा लक्षवेधी ठरणार असून या मिरवणुकीत प्रभू रामचंद्र व हनुमंताची १८ फूट उंचीची मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मूर्तीसह शोभायात्रेत हत्ती, घोड्यासह लाठी, काठी मर्दानी खेळ, पारंपरिक नृत्य प्रमुख आकर्षण असणार आहे.

 

Scroll to Top