
संग्रहित छायाचित्र
शिये (ता. करवीर ) येथील डोंगरास आग लागून शेकडोंची वनसंपदा जळून खाक झाली. तर या आगीत वन्यप्राणी ससा, सरपटणारे प्राणी लहान मोठे किटक मृत्युमुखी पडले . वनविभागाकडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण रखरखत्या उन्हामुळे आग आटोक्यात आली नाही. या आगीत जवळपास १० एकर डोंगर जळून खाक झाला. ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
शिये (ता. करवीर) येथील गावच्या उत्तरेस मगदूम खण व क्रशर भागातून आज सकाळी ९ वाजण्यासुमारास डोंगराला अचानक आग लागली. या आगीने बघताबघता रौद्ररूप धारण केले. त्यामध्ये उन्हाचा तडाखा जोरात असल्याने गवतासह वनसंपदा वाळल्या असल्याने आग पकडून काही तासात १० एकर डोंगर जळून खाक झाला. या लागलेल्या आगीबाबत वनविभागाच्या अधिका-यांना याची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. कारण आग लागली त्या ठिकाणच्या पुढे जावून आग विजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी उंच डोंगरातून वाट काढत पुढे जावे लागत होते.
आग सर्वत्र पसरल्याने पुढे जाणाऱ्या पायवाटा बंद झाल्या होत्या. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठीवर पाच ब्लोअर फायर लावून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत शेकडो जंगली वनसंपदा, ससा , साप व अन्य लहान प्राणी जळून मृत्युमुखी पडले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी करवीर विभागाचे वनक्षेत्र पाल रमेश कांबळे, वनपाल शैलेश शेवडे, एम. एस. पवार, वन कर्मचारी यांच्यासह शिये येथील ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली.
