शेतकर्‍यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करावी : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

शेतकर्‍यांच्या पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याच्या आदेशाला 25 जुलैपर्यंत दिलेल्या स्थगितीची मुदत वाढवून यावर अंतिम निर्णय होईपर्यंत शेतकर्‍यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करण्याचा सक्त सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी दिल्या. काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत शेतकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. दोन वर्षांच्या आता गळतीचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाणी वाटपाच्या नियोजनाची कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या सभागृहात मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शेतीसाठी प्रति हेक्टर 1122 रुपये पाणीपट्टी होती. त्यात 10 पट वाढ करून नव्याने पाणीपट्टी वसुलीची आकारणी सुरू केली होती. याला शेतकर्‍यांच्या विरोध झाल्यानंतर मात्र शासनाने जुलै 2025 पर्यंत पाणीपट्टी वाढ स्थगित केली. ती स्थगिती आता पुढेही कायम राहील, अशी घोषणाही त्यांनी केली. या बैठकीत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अरुण लाड ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पासाठी कृषी पंपांचे वीज कनेक्शन तटवू नये. प्रायोगिक तत्त्वावर एक-दोन ठिकाणी प्रकल्प उभे करावेत, असेही मंत्री विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात खासदार धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, मा. आ. राजू आवळे, संजय घाटगे, बाबासाहेब देवकर यांनी मते मांडली.

दूधगंगा धरण्याच्या गळतीची दुरुस्तीबाबतचा विषय राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांडला. यावर मंत्री विखे-पाटील यांनी गळती काढण्याचे काम जानेवारीमध्येच सुरू झाले आहे. दोन वर्षाची मुदत आहे. परंतु ते काम गतीने संपविण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. सोलर सक्तीबाबत बाबासाहेब देवकर यांनी प्रश्न उपस्थित केला. इचलकरंजीला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासंदर्भात खा. धैर्यशील माने, आ. राहुल आवाडे यांनी प्रश्न उपस्थित केला. आ. अमल महाडिक यांनी दिंडनेर्लीमध्ये नवीन सिंचन योजना मंजूर करावी, अशी मागणी केली. कोल्हापूर पाटबंधारे विभागातील चारही मोठ्या सिंचन प्रकल्पातील पाण्याच्या सद्य:स्थितीबाबत अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस आमदार डॉ. अशोक माने, शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, मुख्य अभियंता जलसंपदा ह. वि. गुणाले, कोल्हापूर अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे सांगली चंद्रशेखर पाटोळे यांच्यासह कोल्हापूर पाटबंधारे विभागातील सर्व कार्यकारी अभियंता तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वागत केले.
अतिरिक्त पाण्याचा वापर होतो त्याठिकाणी क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मीटर बसविणे योग्य होईल. सहकारी संस्थांचे पाणी वापर संस्थेमध्ये रूपांतर करण्याबाबतचे पत्र आमच्यातील महाभागाने काढले. सहकारी पाणी पुरवठा संस्था उत्तम चालत आहे. या संस्थांवर शेतकर्‍यांचा विश्वास आहे. त्यामुळे सभासद संस्थेला जाब विचारू शकतो. परंतु पाणी वापर संस्थेत हे शक्य नाही. त्यामुळे पाणी पुरवठा सहकारी संस्थांचे रूपांतर पाणी वापर संस्थांमध्ये होणार नाही, असे विखे-पाटील म्हणाले.

Scroll to Top