
पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे ध्वजारोहण उत्साहात पार पडले. शिरपूर जैन येथील पारसबाग परिसरात श्र्वेतांबर जैन समाजाच्या नवनिर्मित चतुर्मुख जैन मंदिरात बुधवारी द्वितीय ध्वजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील इंदरमल चव्हाण जैन यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
आचार्यसम पंन्यासप्रवर श्री चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परम शिष्य पंन्यासप्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज व पंन्यासप्रवर श्री परमहंस विजयजी महाराज यांच्यासह आचार्य भगवंत श्री रवींद्रसागर सुरिश्वरजी महाराज, मुनिराज श्री रत्नवल्लभ विजयजी महाराज, संस्कृत पंडित प.पू.गुरुदेव श्री पद्मऋषिजी म.सा., मधुर गायक प.पू.श्री शालीभद्रजी म.सा.आदीसह साधू साध्वी महाराज व समाज बांधव आदींच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात चतुर्मुख जैन मंदिराचे द्वितीय वार्षिकोत्सव ध्वजारोहण पार पडले.
या महोत्सवाप्रसंगी कार्यक्रमात विधान परिषद सदस्य भावना गवळी व आमदार वसंत खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती होती. तसेच श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे उपाध्यक्ष डॉ.संतोष संचेती, विश्वस्त कांतीलाल बरडीया, मुलचंद संचेती, अनिश शाह, मुकेश कोरडिया, पारसमल गोलेच्छा, हसमुख जैन, प्रकाशचंद सोनी, वैभव शाह आदींसह जिल्ह्यातील व राज्यातील श्र्वेतांबर जैन समाज बांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
