मिरजेत महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणे हटविली

मिरज/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

मिरजेत म्हाडा कॉलनी लगत सातवेकर मळा, येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशाने सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले. महापालिकेने सहा जेसीबीच्या सहाय्याने सात कुटुंबाचे वास्तव्य असलेली मोठ्या इमारती जमीनदोस्त केल्या.
सातवेकर मळा येथील कमाल जमीन धारणा कायद्यातर्गत अतिरिक्त ठरलेली सातवेकर यांच्या साडेसात एकरापैकी महापालिकेस मिळालेल्या सात एकर जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. उर्वरित अर्धा एकर मालक संजय सातवेकर, बाळू सातवेकर व इतरांना सोडण्यात आली आहे. मात्र सातवेकर यांनी महापालिकेच्या जागेत घरे व इमारती बांधल्या होत्या. हे अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयात वाद सुरु होता. जिल्हा न्यायालयाने चार दिवसापूर्वी अतिक्रमण हटवण्यास स्थगिती आदेश उठवल्याने महापालिकेच्या पथकाने सकाळी पोलीस बंदोबस्तात सातवेकर यांची घरे दुकाने पाडण्यास सुरुवात केली. यावेळी कारवाईस विरोध झाल्याने बाचाबाची हमरीतुमरीचा प्रकार घडला. सायंकाळ पर्यंत यां कारवाईत सहा जेसीबीच्या सहाय्याने घरे व दुकाने जमीन दोस्त करण्यात आली. उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, अग्निशमन दल, आरोग्य विभाग यासह महापालिकेच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.

Scroll to Top