एआयच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवावी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार

सांगली / प्रतिनिधी

कार्यक्षमता आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज आहे. आपले वैयक्तीक आणि इतरांचे जीवन सुखकर करण्यासाठी निर्माण केलेलं हे एक साधन आहे. या साधनाचा वापर करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
सांगली जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एआय तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शासकीय विभागांची उत्पादकता व कार्यक्षमता वृद्धी (एन्हान्सिंग प्रॉडक्टिव्हिटी अँड वर्क एफिशिएन्सी युझिंग एआय) या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यशाळेस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शासकीय कामकाजादरम्यान नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे मर्म कळणे आवश्यक आहे. आजची कार्यशाळा ज्ञान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, तहसिलदार योगेश टोम्पे व महानगरपालिका सहआयुक्त अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कोमल चौबळ, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाव्यवस्थापक मोहसिन शेख, श्रद्धा गोटखिंडीकर, विनायक कदम, अनुपम क्षीरसागर यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. महसूल, भूमिअभिलेख आणि अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार अमोल कुंभार व चिटणीस शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तहसिलदार लिना खरात यांनी आभार मानले.

Scroll to Top