जयसिंगपूर / प्रतिनिधी
चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून, गावच्या विकासासाठी माझ्याकडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुणांना कुस्तीची आवड निर्माण होण्यासाठी व कुस्तीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्या उद्देशानेच चिंचवाडमध्ये वाघजाई यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी सांगितले.
चिंचवाड येथे वाघजाई यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी घाटगे बोलत होते.
यावेळी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ चेअरमन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रथम क्रमांकाची ‘गुरुदत्त केसरी’ कुस्ती पै. श्रीमंत भोसले व सचिन ठोंबरे यांच्यात रंगली. गुणांच्या जोरावर पै. भोसले यांनी पै. ठोंबरे यांच्यावर विजय मिळवत ‘गुरुदत्त केसरी’ची गदा व रोख ५१ हजार रुपयेचे बक्षीस मिळवले. द्वितीय क्रमांकाची कुस्ती रोहन रंडे विरुद्ध प्रदीप ठाकूर यांच्यात झाली. यामध्ये पै. रोहन याने एकचाक डावावर विजय मिळवला.
तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. रणजित राजमाने विरुद्ध अतुल डावरे यांच्यात झाली. यात डावरे जखमी झाल्यामुळे राजमाने याला विजयी घोषित केले. यावेळी गणपतराव पाटील, आदित्य घाटगे, शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले, जालिंदर ठोमके, विठ्ठल घाटगे, बजरंग खामकर, नारायण मोहिते, संदीप पाटोळे, सुरेश गोधडे, अभय चौगुले उपस्थित होते.

