कोल्हापूर / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
शिवाजी विद्यापीठामधील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि. १५ फेब्रुवारी या कालावधीमध्ये ‘शिक्षण, उद्योग आणि शासन परिषद १.०’चे आयोजन केले आहे. विकसित भारत २०४७ साठी नवोपक्रम आणि स्टार्टअप या विषयावर ही परिषद होत आहे. याकरिता देशभरातील विविध विद्यापीठे, उद्योग व शासनाच्या संलग्नित विभागांतील मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, परिषदेमध्ये स्टार्टअपची संकल्पना, महत्त्व, त्यातील स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती तसेच शासन व वित्तीय संस्थांकडून मिळणारी आर्थिक व इतर मदत, स्टार्टअपना विविध क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या संधी, शासनाचे सहाय्य, या क्षेत्रासमोरील आव्हाने, बदलते तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिषदेचे उद्घाटन आयआयटी कानपूरचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. यानंतर उद्योजक आनंद देशपांडे, ऋषीकेश धांडे हे ‘व्यावसायिक आयुष्याची तयारी’ या विषयावर तर ज्येष्ठ उद्योजक रामदास माने-पुणे हे ‘उद्योजक घडण्यामागची प्रक्रिया’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवारी बारामती ॲग्रो ट्रस्टचे तज्ज्ञ डॉ. संतोष कारंजे हे ‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ यावर विचार व्यक्त करतील. यानंतर गोरे उद्योग समूह-अमेरिका या संस्थेच्या संस्थापिक व संचालिका विनया गोरे आणि सरदार पटेल विद्यापीठ-आणंद, गुजरात येथील डॉ. सौरभ सोनी मार्गदर्शन करणार आहेत.
