कोल्हापूर / प्रतिनिधी
साडेतीन मुहूतपिकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या सणासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक विधी केले जातात. अंबाबाईची झोपाळ्यावर बसलेल्या रूपात अलंकार पूजा बांधली जाते. दरवर्षी ही पूजा गरुड मंडपात केली जाते. मात्र सध्या गरुड मंडपाचे काम सुरू असल्याने याठिकाणी तात्पुरता मंडप उभारण्यात आला आहे.
दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त अंबाबाईची विशिष्ट पूजा बांधली जाते. वैशाखातील उन्हाळी वातावरणात शीतलता यावी यासाठी अंबाबाईचा झोपाळ्यातील पूजा विधी केला जातो. बुधवारी (दि. ३०) अक्षयतृतीयेला दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत हा दोलोत्सव साजरा केला जाणार आहे. फुलांनी सजवलेल्या झोपाळ्यावर अंबाबाईची उत्सवमूर्ती ठेवण्यात येणार आहे. विधीनंतर भाविकांना डाळीची कोशिंबीर आणि कैरीचे पन्हे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे.

