वंध्यत्व निवारणासाठी स्त्रियांच्या जननेंद्रिय क्षयरोगाचे निदान होणे महत्त्वाचे आहे, असा सूर कोल्हापुरात शनिवारपासून सुरू झालेल्या तज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेत व्यक्त करण्यात आला.
इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शन (आयएसएआर) महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा डॉ. पद्मारेखा शिशिर जिरगे यांच्या नेतृत्वाखाली वंध्यत्वाशी संबंधित एक गंभीर समस्या असलेल्या स्त्रियांचा जननेंद्रिय क्षयरोग (टीबी) या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय तज्ज्ञ परिषदेला सुरुवात झाली. रविवारी परिषदेचा समारोप होणार आहे. जननेंद्रियांचा सुप्तावस्थेतील क्षयरोग हा भारतातील स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक मोठे कारण आहे. हा रोग गर्भाशय, अंडाशय आणि फॅलोपियन ट्यूब्समध्ये पसरतो आणि अनेक वर्षे कोणतीही लक्षणे दाखवत नाही. या आजारामुळे नैसर्गिक गर्भधारणेत अडथळे येऊन सरोगसीसारख्या उपचारांची आवश्यकता निर्माण होते.
या परिषदेत ‘मॉडिफाईड डेल्फी’ प्रक्रियेच्या माध्यमातून जननेंद्रिय क्षयाच्या चाचण्या निश्चित करण्याबाबत एकमत होण्याच्या द़ृष्टीने चर्चा होत आहे. देशातील प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञ या चर्चेत सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रमुख आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. नलिनी कौल-महाजन (नवी दिल्ली), डॉ. उमेश जिंदल (चंदीगड), प्रा. जे. बी. शर्मा (एम्स, नवी दिल्ली), डॉ. शोभना पट्टेड (बेळगाव), डॉ. देविका गुणशेला (बंगळूर), डॉ. चैतन्य शेंबेकर (नागपूर), डॉ. रचना देशपांडे (ठाणे) यांचा समावेश आहे. इतर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून डॉ. विकास ओसवाल (मुंबई), डॉ. सुमा कुमार (बंगळूर), प्रा. मीना मिश्रा (एम्स, नागपूर), डॉ. शरथ (सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ) आणि प्रा. दीपक मोदी (एनआयआरआरएच, मुंबई) सहभागी होणार आहेत. या परिषदेचे निष्कर्ष स्त्रियांच्या आरोग्यासाठी विशेषतः वंध्यत्व चिकित्सेच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतील. ज्यामुळे जननेंद्रिय क्षयरोगावर आधारित वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समजून, वंध्यत्वाच्या समस्येचे निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांना आहे.

