कर थकबाकीदारांसाठी धडकी; कुरुंदवाड पालिकेची कठोर वसुली

कुरुंदवाड / प्रतिनिधी

शहरातील प्रलंबित कर वसुलीसाठी कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या केवळ ५१ टक्के कर वसुली पूर्ण झालेली असून, उर्वरित थकबाकी तातडीने वसूल करण्यासाठी मुख्याधिकारी टीना गवळी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
दरम्यान, शहरातील एका नामवंत लिक्विडेशनमध्ये आलेल्या संस्थेच्या इमारतीवर कर थकवल्याप्रकरणी बोजा नोंद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला असून, चार दिवसांत त्याची मंजुरी येणार असल्याने बोजा चढवण्यात येणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली.
पालिका प्रशासनाने मिळकती सील करणे, पाणीपुरवठा कनेक्शन तोडणे आणि मिळकत उताऱ्यावर थकबाकीचा बोजा चढवणे यासारख्या कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेस अधिक गती देण्यासाठी पालिकेच्या वसुली पथक प्रमुखांना वसुलीच्या पार्श्वभूमीवर बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी टीना गवळी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कर थकीत असणाऱ्या नागरिकांकडून तातडीने थकबाकी भरण्यासाठी आवाहन करा अन्यथा थकबाकीदारांच्या मिळकती सील करणे, थकबाकी असलेल्या मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करणे, थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन पूर्ववत न करणे, थकबाकीची नोंद मिळकत उताऱ्यावर करणे, थकबाकी भरल्याशिवाय मिळकत विक्री किंवा हस्तांतरणावर बंदी यासह आदी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Scroll to Top