पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडीचे प्रस्थान

पंढरपूर/प्रतिनिधी

युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहे. त्यानिमित्ताने पादुकांसह दिंडी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांच्याकडील पादुकांचे विठ्ठल चरणी पूजन करून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ही पूजन करण्यात आले.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगांवकर, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर यांचे मुळ गाव अहिल्यानगर असून सध्या ते लंडन, युके येथे स्थायिक आहेत. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत. यानिमित्ताने २१ जून २०२५ अखेरपर्यंत पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.
याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, यूरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी पंढरीची वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सुमारे २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथून ही दिंडी मार्गस्थ झाली आहे. ता. १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा २२ देशातून मार्गस्थ होऊन ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवाकस करत कारने या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगितले आहे.

Scroll to Top