दत्तजयंती

दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत.

श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकस्वरूप आहे. दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली. महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.

भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात.दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.दत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते.पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते.या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही.

Scroll to Top