डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. आर के. शर्मा नवे कुलगुरू

कोल्हापूर/ प्रतिनिधी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फेब्रुवारी २०२० पासून डॉ. आर. के. मुदगल कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने फार्मसी कॉलेज, फ़िजिओथेरपी कॉलेज, अलाईड हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सारखी नवी महाविद्यालये सुरु झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापिठाला नॅकचे ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे.
कुलगुरू पदासाठी देशभरातील ६५ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून त्यातील १५ जणांच्या मुलाखती घेऊन तीन उमेदवारांची नावे कुलपतींकडे सादर करण्यात आली होती. यामधून डॉ. आर.के. शर्मा यांची कुलगुरू पदासाठी नियुक्ती करण्यात आली.
डॉ. शर्मा हे गेल्या ९ वर्षापासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यापूर्वी त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ सेवा दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर ते कार्यरत आहेत. त्यांना ४० वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ आणखी नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करत पुढील पाच वर्षात जगातील ५०० विद्यापीठामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न होईल, असा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, डॉ. अभिजित माने यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल शिंदे यांनी केले.

Scroll to Top