सीपीआरचे नूतनीकरण ऑक्टोबरअखेर पूर्ण करा – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर / प्रतिनिधी

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाची सर्व कामे येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सीपीआरमधील नूतनीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीस सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, माजी अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे, डॉ. रणजीत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, कनिष्ठ अभियंता आशिष पाटील, विद्युत विभागाचे उपअभियंता नवनाथ बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, नूतनीकरणासाठी सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश रुग्णांचे स्थलांतर करणे अत्यावश्यक आहे. रुग्णांची गैरसोय टाळून त्यांच्या स्थलांतराचे योग्य नियोजन करा. जेव्हा इमारती ठेकेदाराच्या ताब्यात दिल्या जातील, तेव्हा कामांची नियमित नोंद ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये कामाचा प्रारंभ, सद्यस्थिती आणि प्रगती यांचा तपशील अद्ययावत ठेवा.गळती होत असलेल्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करा. तसेच इमारतींवर सौरऊर्जेचे पॅनल बसवावेत.सीपीआर परिसरातील रस्ते, गटर, फूटपाथ यांच्यासह सर्वच विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सीपीआर प्रशासनाला इमारतींचा ताबा लवकरात लवकर मिळवून देण्याचे आवाहन केले. यावर अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी, रुग्णांची गैरसोय टाळून त्यांचे पर्यायी जागांमध्ये स्थलांतर करून लवकरच इमारतींचा ताबा दिला जाईल, असे सांगितले.

Scroll to Top