कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांत सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून दुसरा क्रमांक पटकावलेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
शंभर दिवसांत सर्व विभागांनी चांगले काम केले असून आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गतच ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा, असे आदेश यावेळई मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण, धोरणात्मक बाबी कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा व अधिकाऱ्यांचा गुणगौरव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला.

