गणेशनगर भागातील नागरिकांचे पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील गणेशनगर भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी भागातील नागरिकांनी महापालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर अर्धा तास ठिय्या मारत आंदोलन केले. अखेर आयुक्त पल्लवी पाटील यांनी जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.
गणेशनगर भागात पाणी पुरवठा केला जातो. त्यावेळी पहिला केवळ पश्चिम भाग आणि नंतर पूर्ण भागात पाणी पुरवठा होतो. मात्र गेले कित्येक दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे दोन भागात विभागणी करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. पण असल्याने भागातील संतप्त नागरिक शुक्रवारी थेट महापालिकेत पोहोचले. आयुक्तांना भेटण्यासाठी जाताना त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवल्याने नागरिकांनी कार्यालयासमोरच ठिय्या मारत आंदोलन सुरु केले.
सुमारे अर्धातासाच्या आंदोलनानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून खंजिरे औद्योगिक वसाहत हा पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र भाग केला जाईल. त्यासाठी दुसरी जलवाहिनी टाकू न पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात माजी नगरसेवक राजू खोत, सागर बेंद्रे, सोमनाथ वाघमारे, बंडा एकार, राजश्री पागडे, चंद्रभागा ठोके, नंदा कांबळे, लक्ष्मी कोकाटे, सुवर्णा लुगडे यांच्यासह भागातील नागरीक सहभागी झाले होते.

Scroll to Top