इचलकरंजी महानगरपालिकेवर पाण्यासाठी नागरिकांचा मोर्चा

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील शहापूर एस.टी. आगारामागे असणाऱ्या साईनगर येथील जलवाहिनी बदलून पाणी पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागाच्या दालनाबाहेर नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. आठ दिवसांत जलवाहिनी बदलण्याचे आश्वासन जल अभियंता वाजीराव कांबळे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
शहापूर येथील साईनगरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. कुपनलिका खोदत असताना भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खराब झाली होती. त्यानंतर जलवाहिनी बदलली असतानाही जलवाहिनीमध्ये गाळ साचल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नळांना कमी दाबाने
पाणी येत असल्याने या भागांमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत अनेकवेळा महापालिकेला निवेदन देऊनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्याच्या निषेधार्थ साईनगरमधील महिला व नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. प्र. जल अभियंता बाजीराव कांबळे व अभय शिरोलीकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर जलवाहिनी आठ दिवसांत बदलून देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
आंदोलनात राजकुमार गेजगे, बाबासाहेब मिरजकर, अल्लाबक्ष कलावंत, आकाश गायकवाड, अमोल गलांडे, आबासाहेब मिरजकर, मेहबूब तकली, करिष्मा कलावंत, आरमाना कलावंत आदींनी सहभाग घेतला होता.

Scroll to Top