नागाळा, ताराबाई पार्कात पाण्यासाठी दुसर्‍या दिवशीही नागरिकांची वणवण

सलग दुसर्‍या दिवशी ‘ई’ वॉर्डात पाण्याचा ठणठणाट होता. हंडाभर पाण्यासाठी सकाळपासून महिलांची धावाधाव सुरू होती. महापालिकेकडे पाणीपुरवठा करणारे दोनच टँकर आहेत. तेथे दोनशेहून अधिक विभागातून फोन खणखणत होते. महापालिकेची यंत्रणा तोकडी पडली आणि नागरिकांचे अतोनात हाल झाले.

ई वॉर्डाला थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडी टेकडी येथे आल्यानंतर तेथून ते एका स्वतंत्र जलवाहिनीद्वारे कसबा बावड्याकडे नेले जाते. फुलेवाडी रिंगरोडमार्गे जुन्या शिंगणापूर योजनेच्या जलवाहिनीला ही वाहिनी जोडण्यात आली आहे. या जलवाहिनीला फुलेवाडीजवळ गळती लागली होती. ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे बुधवारपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. सलग दुसर्‍या दिवशी देखील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

ई वॉर्डातील संपूर्ण कसबा बावडा परिसर, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, मार्केट यार्ड, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, टेंबलाईवाडी, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, राजारामपुरी व शाहूपरीच्या काही भाग तसेच ताराबाई पार्क, नागाळा पार्क, न्यू ताराबाई पार्क आदी ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. सकाळपासून शहरातील दाट वस्त्यांमध्ये पाणयासाठी ही धावपळ सुरू होती.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे दोनच पाण्याचे टँकर आहेत. या दोन्ही टँकरवरच ई वॉर्डाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी होती. सकाळपासून टँकर मिळविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे विविध भागांतून फोन खणखणत होते. परंतु दोनच टँकर असल्याने अनेक भागाला टँकर मिळालाच नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना पैसे भरून पाण्याचा टँकर मागवावा लागला. दोनशेहून अधिक फोन टँकरसाठी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात येऊन गेले होते.

काही मोजक्याच ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. दरम्यान, त्या-त्या भागातील कूपनलिका किंवा टेम्पोमध्ये पाण्याची भांडी भरून नागरिकांनी मिळेल तेथून पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला.

Scroll to Top