संग्रहित छायाचित्र
‘जय भवानी, जय शिवाजी’ हा अखंड जयघोष… ढोल-ताशांचा गजर… नेत्रदीपक आतषबाजी… अशा जल्लोषी वातावरणात श्री शिवाजी तरुण मंडळाकडून सामाजिक संदेश देत छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अर्धा शिवाजी पुतळा येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. शाहू महाराज यांच्या हस्ते या मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.
शहरातील विविध समस्यांवर आधारित सामाजिक संदेश देणारे फलक मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत होते. यात शहराच्या हद्दवाढीपासून ते कोल्हापूरच्या खंडपीठापर्यंतच्या समस्या मांडल्या होत्या. छत्रपती शिवरायांचा भव्य, आकर्षक अश्वारूढ पुतळा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. पारंपरिक लवाजम्यासह निघालेल्या या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरवर ऐतिहासिक देखावे, महिलांचे लेझीम पथक, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ सहभागी झाले. त्याचबरोबर विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे फलकदेखील या मिरवणुकीत दिसून आले.
घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषेत सहभागी कार्यकर्ते आणि बालचमू लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीत भगव्या साड्या आणि फेटे परिधान केलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. खंडोबा, वेताळ ठोंबरे वस्ताद मर्दानी आखाड्याच्या बालमावळ्यांनी ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड गुजरीमार्गे मिरवणूक श्री शिवाजी तरुण मंडळाजवळ आणण्यात आली. मिरवणुकीने शहरातील वातावरण शिवमय झाले होते.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, रविकिरण इंगवले, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, अॅड. धनंजय पठाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवजयंती उत्सवचे कार्याध्यक्ष राहुल इंगवले, अजित खराडे, लालासाहेब गायकवाड, राजू सावंत, प्रसाद पाटील यांच्यासह शिवाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या मिरवणुकीचे वेगळेपण जपले जाते. यावर्षी हद्दवाढीवरचे फलक लक्षवेधी ठरले. एका फलकावर ‘शहरातील सुविधा घेता, मग हद्दवाढीला विरोध का करता,’ असा उल्लेख होता. ‘यंदा हद्दवाढ होणारच,’ तर ‘शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व कुत्र्यांचे वाढते हल्ले रोखा,’ असा फलकही होता.

