
संग्रहित छायाचित्र
महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून हे रोखण्यासाठी जिल्ह्यातील १ ते २६ वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक (एचपीव्ही) लस देण्यासाठीचा संकल्प केला असून सीएसआर निधी व लोकसहभागातून ही लस उपलब्ध करुन दिली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात ८८ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाता डॉ. एम. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ही विकास कामेकरणाऱ्या कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची सर्व कामे या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होतील. तसेच शेंडा पार्क परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या १९०० बेडच्या रुग्णालयाचे काम दोन वर्षात पूर्ण होईल, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी व निसर्गोपचार शासकीय रुग्णालय व महाविद्यालयांची कामेही गतीने मार्गी लावणार असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण देण्यासह रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा, सुविधा देणे हेच वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ब्रीद आहे. यावेळी सीपीआर रुग्णालयातील सर्व इमारतीच्या नूतनीकरणाची कामे वर्ष अखेर पर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहित तोंडले यांनी दिली.
वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.एम.एस.मोरे यांनी प्रास्ताविकातून सीपीआर रुग्णालयात आजवर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मानसोपचार विभाग, स्त्री रोग विभागातील शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग, नर्सिंग मुलीचे हॉस्टेल व ईएनटी विभाग, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाच्या वाॅर्डचे नुतनीकरण, प्रत्येक वाॅर्डमध्ये आयाधुनिक बेड आदी विविध विकास कामांची माहिती त्यांनी दिली. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले.
