इचलकरंजी / प्रतिनिधी
चुकीच्या पद्धतीने टाकलेले आरक्षण त्वरित रद्द करावे, अन्यथा मुख्य चौकात क्रिकेटसह विविध खेळ खेळून आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी बुधवारी दिला. आरक्षणाबाबत महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. चुकीच्या पद्धतीने पडलेले आरक्षण आणि क्रीडांगण याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आयुक्त पाटील यांनी दिली.
महापालिकेच्या नव्या प्रारूप विकास आराखड्यात प्रभाग क्रमांक १० मधील गट नं. ७८ याठिकाणी लोकवस्तीच्या ठिकाणी क्रीडांगण आणि गट नं. ११७ या क्रीडांगणाच्या ठिकाणी पडलेले अन्य आरक्षण चुकीचे असून, ते रद्द करावे या मागणीसाठी राजू बोंद्रे यांनी सहा महिन्यांपूर्वी महापालिकेवर मोर्चा काढला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भागातील नागरिकांनी आयुक्त पाटील यांची भेट घेऊन आरक्षण रद्दची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी बुधवारी प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन पाहणी केली.
आरक्षणासंदर्भात माहिती घेऊन येथे वास्तव्यास असलेल्या एकाही घराला अडचण होऊ देणार नाही. याच परिसरातील क्रीडांगणाच्या ठिकाणचे आरक्षण कसे काढता येईल, यासंदर्भातही चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली आहे.

