‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं…’, ‘हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं..’ असा अखंड जयघोष तसेच दोनशे पोती भंडार्याची उधळण व सोबतीला ढोलांचा धीरगंभीर दणदणाट अशा वातावरणात मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील सद्गुरू बाळूमामा यांनीच स्थापन केलेल्या हलसिद्धनाथ मंदिरात हालसिद्धनाथ व बाळूमामा भंडारा उत्सव झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेश येथून सुमारे लाखभर भाविकांची मांदियाळी फुलली होती.
जसे मामांनी इथे ज्ञानेश्वरी व विठ्ठल प्रतिमेच्या पूजनाने या मंदिराची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे हा भंडारा देखील मामांनी 1932 मध्ये स्वतः 40 गावांना चालत जाऊन निमंत्रण देऊन सुरू केला असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने विविध पंचवीसभर गावांचे वालंग ढोलवादन मंडळांसह उपस्थित होते. सुरुवातीला मंदिरात पालखी पूजन झाले. त्यानंतर देवाचा सबिना (पालखी सोहळा) निघाला. यावेळी अखंड ढोलवादन, देवाच्या अश्वाचे नृत्य यात भाविक दंग झाले होते. मध्यवर्ती चौकात पालखी भेटीचा सोहळा पार पडला.
पुन्हा रात्रभर हेडामचा खेळ व अन्य कार्यक्रमांनी जागर झाला. या सर्व सोहळ्यासाठी रात्रभर भाविक येतच होते. बाळूमामा त्यांचे सद्गुरू मुळे महाराज व विठ्ठल-रखुमाई यांचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. सर्व गावभर रस्ते व गल्ल्या भंडार्याने पिवळ्या धमक झाल्या होत्या. यावेळी प. पू. भगवान गिरी महाराज, ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष आर. डी. पाटील, सदस्य बाबासाहेब पाटील, दयानंद पाटील, बळीराम मगर, पद्मजा तिवले, देवाप्पा पुजारी, नारायण बुधले आदी उपस्थित होते.
नानीबाई चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दोन दिवस वैद्यकीय सेवा देण्यात आली. या सोहळ्याचे नेटके नियोजन उत्सव समिती, तरुण मंडळे, ग्रामस्थ व सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने केले होते.
