बाबूराव खोत यांच्या बैलजोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मान

निपाणी / प्रतिनिधी

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-पंढरपूर वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठीच्या बैलजोडीचा मान यंदा कर्नाटकातील आप्पाचीवाडी (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील बाबूराव अर्जुन खोत यांच्या बैलजोडीला मिळाला आहे.
संत तुकाराम महाराज देहू संस्थानने यंदा संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध बैलजोड्यांची पाहणी केली. यामध्ये आप्पाचीवाडीतील खोत कुटुंबीयांची जोडी संस्थानच्या पसंतीस उतरली. गुरुवारी बैलजोडीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हालसिद्धनाथ मंदिराच्या प्रदक्षिणेनंतर ही मिरवणूक खोत कुटुंबाच्या घराजवळ पोहोचली. गावातील विविध ठिकाणी बैलजोडीची ओवाळणी करून पूजन केले. बैलांना पाणी घालून सन्मानाने त्यांच्या सेवेला मान दिला. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतून नागरिकांनी गर्दी केली होती.

Scroll to Top