कोल्हापूर / प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक कुटुंबाचा आधारवड असतात. ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्तार वयात औषधोपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज भासू नये, स्वतःची औषधे स्वतः खरेदी करता यावीत यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. दरवर्षी ३ हजार या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना हे अनुदान दिले जाते.
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार लाभार्थीना १२ कोटी १० लाख ५० हजार रुपये जमा केले आहेत. पण नवीन नोंदणी बंद असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
६ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना जाहीर झाली. त्यामध्ये राज्यातील ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी ६५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १ लाख २ हजार ९३० लाभार्थीनी सामाजिक न्याय खात्याकडे अर्ज केले होते. त्यातील ९८ हजार ४६७ लाभार्थी पात्र ठरले. त्यातील ४० हजार ३५० लाभार्थीना ३ हजार प्रमाणे १२ कोटी १० लाख ५० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत, तर ४० हजार लाभार्थीचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून त्यांच्याही खात्यावर लवकरच पैसे जमा होतील, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी सांगितले.
