शक्तिपीठ विरोधी मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा : राजू शेट्टी

जयसिंगपूर / प्रतिनिधी

राज्य सरकारच्या वतीने धार्मिक स्थळांच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच पर्यटनांच्यादृष्टीने शक्तिपीठ महामार्ग करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना भूमिहीन करून जनतेलाही देशोधडीला लावणार आहे. मुंबई येथील विधानभवनावर बुधवार (दि. १२) मार्च रोजी होणाऱ्या शक्तिपीठ विरोधी मोर्चास राज्यातून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी शक्तिपीठ विरोधी कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सहापदरी रस्त्यासाठी जास्तीत जास्त ३५ कोटी रुपये खर्च होत आहे. मात्र शक्तिपीठ महामार्गाचा १ किलोमीटर रस्त्यासाठी १०८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. राज्य सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने जवळपास ५७ हजार कोटीचा भ्रष्टाचार शक्तिपीठ रस्त्याच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संघटित करून हा लढा तीव्र करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या बैठकीस गिरीष फोंडे, सम्राट मोरे, अजित पोवार, डॉ. बाळासाहेब पाटील, मायकल बारदेस्कर, शिवाजी कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top