कोल्हापुरात एटीएमला आग

कोल्हापूर / प्रतिनिधी

रुईकर कॉलनी परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम मशीनला रविवारी मध्यरात्री सुमारे एकच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. एटीएम सेंटरमधून धुराचे लोट बाहेर येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशामक – दलास माहिती दिली.
सासने ग्राऊंड आणि कसबा बावडा येथून दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून या आगीत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, सर्वच बँकांनी त्यांच्या एटीएम सेंटरमधील अग्निशामक यंत्रणांची तपासणी करून त्यांना अद्ययावत करावे, तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, असे आवाहन अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
ही आग विझवण्यासाठी स्थानिक अधिकारी जयवंत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जवान उमेश जगताप, शुभम कुंभार, रघू साठे, तानाजी वडर आणि निवास जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Scroll to Top