दिवाळीची सुट्टी लागताच बालचमु लागले किल्ल्याच्या तयारीला
मनिष कुलकर्णी
जिल्ह्यातील बहुतांश शाळांच्या प्रथम सत्रातील परीक्षा आज संपल्या आहेत. शेवटचा पेपर देताच विद्यार्थ्यांची पावले लाल माती गोळा करण्यासाठी राण-माळावर वळताना दिसत आहेत. बाजारपेठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, प्राणी, बुरुज यांसारख्या गोष्टी घेण्यासाठी गर्दी वाढली आहे.
शहरांमध्ये जरी तयार किल्ल्यांची फॅशन आली असली तरी आज देखील ग्रामीण भागात प्रत्येक घरासमोर मुलांनी तयार केलेला लाल मातीचा किल्ला दिसत आहे. त्यासाठी मुलांचे ग्रुप रानमाळावर दगड व लाल माती गोळा करताना दिसत आहे. झपाटाने वाढणाऱ्या डिजिटल युगात देखील ही परंपरा आज ग्रामीण भागात जपली जात आहे. मुलांनी उभारलेली किल्ल्याची प्रतिकृती, अगदी अल्प कालावधीत त्यावरती उगवून आलेलं हळीव व खपली गहू, अगदी सुबक पद्धतीने मांडलेले सैनिक या सगळ्यामुळे दिवाळी सणाच्या आनंदात आणखीच भर पडते.