तळसंदेत सशस्त्र दरोडा

वारणानगर/ प्रतिनिधी

तळसंदे, (ता. हातकणंगले) येथील दोन घरातून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकण्यात आला. यात साडे अठरा तोळे सोने व रोख पन्नास हजार रुपये घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. दरम्यान अन्य दोन ठिकाणी चोरट्यांकडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नवजीवन दूध संस्थेचा सायरन वाजवल्याने गाव जागा झाला. त्यामुळे अन्य चोरीचा व अनुचित प्रकार टळला. या घटनेने तळसंदे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रविवारी दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी घटनास्थळी पहाणी केली. घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री माणिक बापूसो मोहिते यांच्या घराचा कडीकोयंडे तोडून अज्ञातांनी घरात प्रवेश केला. दरम्यान या पूर्वी औद्योगिक वसाहतीतून नोकरीवरून आलेला त्यांचा मुलगा महेश मोहिते जागा होता. अन्य खोलीत आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडून आवाज करताच त्या खोलीतून चोरट्यांनी पलायन केले. त्यामुळे येथील चोरीचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील महादेव राजाराम चव्हाण यांच्या शेतातील असलेल्या घराकडे वळविला. प्रदीप चव्हाण यांच्या घरास प्रवेश करुन आईच्या गळ्यात असलेली सोन्याची चेन हिसकावून घेऊन तिथुनही पलायन केले. यानंतर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला.

Scroll to Top