जांभळी (ता.शिरोळ) येथे अज्ञाताच्या गैरकृत्यामुळे मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या पाच डेरेदार वृक्षांना आग लागण्याची घटना घडली आहे. त्या झाडांच्या खालीच भाजीपाल्याचा कचरा पेटवल्याने झाडांच्या बुंध्यानी पेट घेतली. यामध्ये नेहमी सावली देणारी झाडे होरपळून गेल्याने वृक्षप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून चौकशीअंती संबधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
येथील जांभळी-यड्राव रस्त्यावर किमान दोन कि.मी.अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या उंचीची गर्द झाडे आहेत. नेहमी हिरवाईने नटलेली पाच झाडे आगीच्या स्थानी भक्ष्य झाली. अज्ञाताच्या गैरकृत्याचा पंचनामा जरी झाला असला तरी याबाबत कारवाई होणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
वृक्षांना आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच अनुजा कोळी व अनिल कोळी तत्परता दाखवत ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्यासाठी विनंती करत बचावकार्य गतिमान केले. यावेळी सरपंचपती अनिल कोळी यांनी दत्त सहकारी साखर कारखान्याला फोनवरून माहिती देत एक अग्निशामक दलाची गाडी बोलावून घेतली. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी उशीरा आग आटोक्यात आणली.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष हानी टळली.दरम्यान धुराचे लोट मोठया प्रमाणात परिसरात पसरल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

