कोल्हापूर / प्रतिनिधी
येथील अंबाबाई मंदिर परिसर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त झाला असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापन व आवारातील पूजा, ओटी साहित्य विक्रेत्यांकडून भाविकांना कापडी पिशव्या, कागदी पाऊच देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. २०१८ पासून अंबाबाई मंदिरात प्लास्टिकमुक्तीचा जागर सुरू असून गेल्या सात वर्षांत मंदिर आवारातून प्लास्टिकला हद्दपार करण्यात यश आले आहे.
मंदिरात नैसर्गिक गोष्टी जपल्या जाव्यात, या हेतूने देवस्थान समितीच्या वतीने २०१८ मध्ये प्लास्टिकमुक्त मंदिर आवार ही संकल्पना राबवण्यात आली. याअंतर्गत मंदिराच्या आवारातील ओटी व पूजा साहित्य विक्रेत्यांनी ग्राहक भाविकांना पूजा साहित्य देण्यासाठी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशव्यांचाच वापर करावा, अशी सूचना देऊन याबाबत नियमावली तयार करण्यात आली. या आवाहनाला पूजा साहित्य विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला. गेल्या सात वर्षांपासून कापडी पिशव्यांच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीनेही प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला आहे. मंदिरात विविध सणउत्सवकाळात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या निमंत्रित कलाकार, तसेच अभिषेक करणाऱ्या भाविकांना ओटी, नारळ, प्रसाद देण्यासाठी देवस्थानच्यावतीने कापडी पिशव्या बनवून घेतल्या आहेत. या कापडी पिशव्यांचाच वापर केला जातो. मंदिराच्या
बाह्यपरिसरातही काही दुकाने आहेत. त्यांनीही कापडी पिशव्यांचा वापर करावा यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
महिला उत्पादकांना संधी मंदिर आवारातील दुकानदार, देवस्थान यांच्यावतीने महिला उत्पादक, बचत गट यांच्याकडून कापडी पिशव्या व कागदी पाउच खरेदी करण्यात येतात. यामुळे महिलांनाही अर्थिक कमाईची संधी मिळते.
