अखिल भारतीय होमिओपॅथी संस्था कोल्हापुरात स्थापन करू : खा. धनंजय महाडिक

अखिल भारतीय होमिओपॅथी संस्थेची स्थापना कोल्हापुरात करू. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस् असोसिएशन ( होमेसा ) आयोजित ‘होमेसाकॉन 2025’ परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही परिषद छत्रपती ताराराणी चौक येथील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात रविवारी झाली.

खासदार महाडिक म्हणाले, होमिओपॅथी प्राचीन उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढला आहे. कोरोना काळात होमिओपॅथीद्वारे अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. कोल्हापूर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांच्या केंद्रस्थानी आहे. यामुळे येथे अखिल भारतीय स्तरावरील होमिओपॅथी संशोधन संस्थेची स्थापना होणे गरजेचे आहे. या संस्थेमुळे संशोधनाला चालना मिळेल. लवकरच केंद्रीय आयुष मंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करू.

दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉ. मंगेश जतकर म्हणाले, प्राथमिक आरोग्यसेवेपासून होमिओपॅथीचा वापर केल्यास दैनंदिन बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना अल्प खर्चामध्ये उपचारांचा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. डॉ. राहुल जोशी ‘मानसिक आरोग्यासाठी होमिओपॅथी’ विषयावर म्हणाले, सतत उद्भवणार्‍या आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धतीच योग्य आहे. प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा यांनी ‘वैद्यकीय व्यवसायिकांसाठी नवीन नियमावली’, डॉ. प्रशांत तांबोळी ( मुंबई ) यांनी ‘होमिओपॅथीचा संशोधन विकास’ या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. संतोष रानडे, डॉ. सपना शहा, डॉ. श्रेयस पांचाळ, डॉ. मंदार कुंटे यांची व्याख्याने झाली.

ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. रविकुमार जाधव यांना होमिओपॅथीमधील योगदानाबद्दल डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. मंदार कुंटे, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. जितेंद्र वीर, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. अजय हनमाने, डॉ. सचिन मगदूम, डॉ. दीपक लडगे, डॉ. सुनील औंधकर, डॉ. संजय केटकाळे यांच्यासह सुमारे 400 होमिओपॅथ्स उपस्थित होते. ऑनलाईन 1000 होमिओपॅथस्नी हजेरी लावली होती. स्वागत होमेसा प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी केले. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले.

Scroll to Top