पंढरपूर / प्रतिनिधी
संपूर्ण वर्षभर वारकरी भाविक ज्या वारीची वाट पाहतात त्या आषाढी यात्रेवर पोलीस प्रशासनाकडून यंदा प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यात्रेवर सुमारे दहा ते बारा ड्रोणच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यात्रेत महत्वाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवून काही गोंधळ निर्माण झाल्यास त्या ठिकाणी पोलीस प्रशासन तात्काळ पोहोचणार आहे.
यात्रेतील वारकऱ्यांची संख्याही मोजली जाणार आहे. चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांवर लक्ष वेधले जाणार आहे. त्यामुळे यंदाची आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडणार असल्याचे सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आषाढी यात्रेला मानाच्या पालख्यांबरोबर विविध संतांच्या ठिकठिकाणाहून पायी वारी पंढरपूरकडे निघाली असून सुमारे १५ ते २० लाखांवर वारकरी भाविक आषाढी यात्रा देवशयनी एकादशी सोहळा पंढरपुरात येऊन साजरा करतात. यावेळी गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणार नाही याची पोलीस प्रशासन काळजी घेणार आहे. तसेच नामदेव पायरी, चंद्रभागा नदी, वाळवंट व शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या २५० सीसीटीव्ही कॅमेरातून आषाढी यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचे काम होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
चंद्रभागा नदी व वाळवंट परिसर स्वच्छ राहणार असून त्या ठिकाणी टाकले जाणारे जुने कपडे, चपला एका मशीन द्वारे सतत काढले जाणार आहे. गोपाळ कृष्ण मंदिरापासून व्हीआयपी गेटपर्यंत यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील सर्व पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. एकेरी मार्ग व्यवस्थित चालण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांना सूचना देण्यात येणार आहे. यंदाची आषाढी यात्रा अपघात मुक्त यात्रा करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर असणार आहे, असेही जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

