पुलावरून चारचाकी कोसळून तिघांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग, अखेर उदगाव पुलावर संरक्षक ग्रील बसविण्यास सुरुवात

उदगाव/ प्रतिनिधी

उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरील संरक्षक कठड्याचा काही भाग कोसळला होता. याच ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघात तिघांचा बळी गेल्याने राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला जाग आली आहे. सोमवारपासून उदगाव पुलावर संरक्षक ग्रील बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
जुन्या पुलावर २०१८ मध्ये ट्रकच्या धडकेत सुरुवातीचा संरक्षक कठडा ढासळला होता. त्यानंतर २०१९ साली या पुलावरून चारचाकी खाली कोसळली होती. जानेवारी २०२४ मध्येही दुसऱ्यांदा चारचाकी कोसळली होती. त्याचबरोबर गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूर येथून लग्नाचे रिसेप्शन करून जाणाऱ्या कुटुंबातील तिघांचा पुलावरून चारचाकी कोसळून मृत्यू झाला.
या अपघातानंतर राष्ट्रीय प्राधिकरण विभागावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. जयसिंगपूर पोलिस प्रशासनाने राष्ट्रीय प्राधिकरण विभागाला तातडीने संरक्षक कठडे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर यांनी हे काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. सोमवारी प्रत्यक्षात उदगाव येथील जुन्या पुलाचे तुटलेले संरक्षक कठडे लोखंडी ग्रीलच्या साहाय्याने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी होणारे काम हे अत्यंत मजबूत करावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांची आहे.

Scroll to Top