आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू

संग्रहित छायाचित्र

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची राज्यस्तरीय सोडत काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना 14 ते 28 फेब—ुवारीपर्यंत या कालावधीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड यादी व पुढील फेरीसाठी प्रतिक्षा यादी आरटीई पोर्टलवरील होमपेजवर अपलोड केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.

शहर स्तरावर महापालिकेकडील व तालुका स्तरावर पंचायत समितीकडील पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांस प्रवेशासाठी बोलविले आहे. त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी. पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे. पालक काही कारणास्तव दिलेल्या तारखेस कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहू शकले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी द्याव्यात.

बालकांना प्रवेश घेण्याकरीता पालकांनी मुदतीत पडताळणी समितीशी संपर्क साधणे गरजेचे आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आरटीई पोर्टलवर केली आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन संबंधित शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्यांकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी.

Scroll to Top