कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करा या प्रमुख मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शिक्षणसेवक सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने गुजरात च्या धर्तीवर कंत्राटी शिक्षण सेवक ह्या पदाची निर्मिती करून शिक्षण क्षेत्रात शिक्षक आणि शिक्षण सेवक अशी दरी निर्माण केली.
राज्यात अनेक वर्षानंतर शिक्षण सेवक भरती झाली. शिक्षणसेवकांना जिथे जागा उपलब्ध असतील तिथे परजिल्ह्यात नोकरी स्वीकारावी लागली आहे. असे असताना अल्पशा मानधनावर काम करताना अनेक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सन २०२४ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीत सरासरी ३५ वर्ष वयाचे शिक्षक भरती झालेले आहेत. त्यामुळे त्यांना कमाल २३ वर्षे इतका अल्प सेवकाळ मिळणार आहे. त्यातही पुन्हा ३ वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करणे अन्यायकारक आहे. हे पद रद्द करावे, या मागणीसाठी आज टाऊन हॉलपासून ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे, जावेद तांबोळी व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष प्रविण पाताडे, राज्य कार्याध्यक्ष संदीप पाडळकर, उपाध्यक्ष सर्जेराव सुतार यांनी केले.

