कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात कोणतेही काम मनापासून केल्यास त्यात मोठा आनंद मिळतो. आपण करत असलेले काम गावाबरोबरच देशासाठी करतो ही भावना ठेवल्यास चांगले काम केल्याचे मनाला समाधान मिळते, अशी भावना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त अभिषेक सुरेश निपाणे कुरुंदवाड या वेटलिफ्टिंग खेळाडूची आई प्रतिभा आणि वडील सुरेश निपाणे यांनी बोलून दाखविली.
कुरुंदवाड शहराचे नाव लौकिक करून सातासमुद्रपार नेलेल्या येथील वेट लिफ्टिंग खेळाडूंच्या मध्ये सुवर्ण अक्षराने नोंद करणाऱ्या अभिषेक सुरेश निपाणे यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्यात अभिषेक निपाणे यास शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवछत्रपती हा पुरस्कार आपणास मिळेल असे मनात सुद्धा वाटले नव्हते. परंतु कठोर परिश्रम गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हा पुरस्कार मिळाल्याचे अभिषेक निपाणे यांने सांगितले.

