हुपरी/ प्रतिनिधी
हपरी परिसरातील चांदी कारागिरांसाठी सामंजस्य करार झाल्याने चांदी कारागिरांच्या नोंदणी बरोबर हुपरी शहरात प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. यामुळे चांदी कारागिरांची चांगली सोय होणार असल्यामुळे कारागिरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हुपरी परिसरातील दहा बारा गावातील पी.एम. विश्वकर्मा योजनेतर्गत पात्र चांदी कारागिरांची नोंदणी व प्रशिक्षण देण्यासाठी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन व केंद्र सरकार अंगीकृत जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे चांदी कारागिरांची नोंदणी बरोबर हुपरी शहरात प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे कौशिक एस. व्ही यांनी व हुपरी चांदी फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.
या करारामुळे हुपरी, रेंदाळ, सामंजस्य करारप्रसंगी उपस्थित एस. व्ही. कौशिक, मोहन खोत, अर्चना पांडे व इतर यळगूड, रणदिवेवाडी, सांगाव, तळंदगे, प. कोडोली, अलाटवाडी, इंगळी तसेच कर्नाटक राज्यातील मांगूर, बारवाड, कारदगा, ढोणेवाडी आदी गावातील चांदी कारागिरांना लाभ होईल. या भागातील चांदी कारगिरांच्या पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी विभागवार नोंदणी केंद्र सुरु करून नोंदणी केली जाणार आहे. हुपरी शहरात प्रशिक्षण केंद्र सुरु करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर कारागिरांना टूल किट, प्रमाणपत्र व उद्योग सुरु करणेसाठी पहिल्या टप्प्यात एक लाख व दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये फक्त पाच टक्के व्याज दराने मिळणार आहेत. यामुळे कारागिरांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.
यावेळी जिजेईपीसीच्या अर्चना पांडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पाडळकर फाऊंडेशनचे संचालक ॲड. जितेंद्र देशमुख, शामराव शिंदे, विलासराव जाधव, संदीप अडसूळे व महाविद्यालयाचे शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
