परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

हातकणंगले/प्रतिनिधी

परभणी येथे झालेली संविधान प्रतीची तोडफोड व त्यानंतर समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनात अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला संशयास्पद मृत्यू, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य अशा विविध घटनांच्या निषेधार्थ हातकणंगले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान निवेदन देण्यापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी निवेदन देताना डॉ. मिणचेकर म्हणाले देशाचे गृहमंत्री एका जबाबदार पदावर असताना देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल भर संसदेत वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व संपूर्ण देशवासीयांची माफी मागावी. तसेच परभणी येथे संविधान प्रतीची झालेली तोडफोड व त्यानंतर समाज बांधवांनी केलेले निषेधार्थ आंदोलन त्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मारहाणीत झालेला संशयास्पद मृत्यू त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मसाजोग गावच्या सरपंच यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागण्यांच्या निवेदन यावेळी तहसीलदार यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात अशा घटना वारंवार होत असून असे झाल्यास सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडे या सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे पण येणाऱ्या काळात हे सर्व असेच सुरू राहिल्यास भारत देशात हुकूमशाही येईल व पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढाई करावी लागेल असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, माजी सरपंच विनायक कोठावळे, शिरीष मधाळे, लक्ष्मण कोळी, विशाल साजणीकर, ओंकार कांबळे, चरण कांबळे, वैभव जमणे नितीन कदम, संतोष कांबळे, अमर आठवले, काका पाटील, हेमंत कांबळे, अजित कांबळे, सुभाष माने, अभिजीत शिंदे, जालिंदर जाधव, बाबासो कांबळे, धोंडीराम कोरवी, अनिल कदम अंकुश चव्हाण, गणेश नाईक, विवेक नागावकर, महेंद्र कांबळे रजत सूर्यवंशी, सुहास हुपरीकर, राहुल शिरसागर तसेच संघटनेचे कुमार जगोजे, अमित पाटील, अक्षय देसाई, अँड सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, भिमसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top