कोल्हापूर / प्रतिनिधी
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. अशा या थोर व्यक्तींच्या विचारांची गरज आजच्या युवापिढीला असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीचे विचार येणाऱ्या पिढीत रुजावेत यासाठी कोल्हापुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
आ. राजेश क्षीरसागर फाऊंडेशन, सकल हिंदू समाज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी संघटनांच्या वतीने महाराष्ट्रदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेल्या आणि अजरामर झालेल्या गीतांचा भरतनाट्यम नृत्य कलाविष्कार तेजोमय तेजोनिधी हा कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे झाला. कार्यक्रमातील नृत्यकलेस व अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या सूत्रसंचालनास प्रेक्षकांनी दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात आ. क्षीरसागर, शरद पोंक्षे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरानी रचलेल्या गीतांवर कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपचे महेश जाधव, विश्वहिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, सावरकर संघटनेचे नितीन वाडीकर, पोलीस निरीक्षक झाडे, संभाजी साळुंखे, गजानन तोडकर, बाबा वाघापूरकर, शालनताई शेटे, रूपाराणी निकम, रणजित जाधव, महेंद्र घाटगे, शाम जोशी, राजू मेवेकरी उपस्थित होते.

