मनोरुग्ण महिलेने अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेलाच फोडला घाम

शुक्रवारी सकाळी दहाची वेळ. एक महिला घाटी दरवाजामार्गे अंबाबाई मंदिरात घुसली. तिला रोखणार्‍या सुरक्षा कर्मचार्‍यांपैकी एकावर तिने चाकू काढत वार केला. चाकूचा वार कर्मचार्‍याच्या कपाळावर झाल्याने तो जखमी झाला. सकाळी ऐन भाविकांच्या गर्दीवेळी घडलेल्या या घटनेने अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेला चांगलाच घाम फुटला. दरम्यान, ही महिला मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. तिला ताब्यात घेत नातेवाइकांकडे सोपवल्यानंतर अखेर सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पर्यटक, भाविकांची अंबाबाई मंदिरात वर्दळ होती. कारंजा चौकातील मंडपात अभिषेक विधी सुरू होते. दहा ते सव्वादहाच्या सुमारास मंदिर परिसरातील जोतिबा रोड येथून घाटी दरवाजातून एक मनोरुग्ण महिला अंबाबाई मंदिराच्या आवारात आली. येताना आठ ते दहा दुकानांमधून ऑनलाईन पेमेंटचे स्कॅनर बोर्ड गोळा करतच ती मंदिरात घुसली. अंगावर सुती गाऊन, केस अस्ताव्यस्त झालेले अशी तिची अवस्था होती.अचानक मंदिराच्या आवारात ती पळत सुटली. तिला रोखण्यासाठी बंदोबस्तावर असलेले पोलिस व सुरक्षा कर्मचारी धावले. तेवढ्यात त्या महिलेने गाऊनच्या खिशातून चाकू काढला आणि समोरच्या सुरक्षा रक्षकाच्या दिशेने उगारला. झटापटीत चाकूचे टोक सुरक्षा कर्मचार्‍याच्या कपाळावर लागले.

दरम्यान, मंदिरात गोंधळ घालणार्‍या मनोरुग्ण महिलेला ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे सोपवण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. संबंधित महिला गंगावेस परिसरातील धोत्री गल्लीतील रहिवासी असून, ती मानसिक रुग्ण असल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. हा प्रकार देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी अमोल येडगे शुक्रवारी मंदिरातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी येणार होते. तसेच, शुक्रवार असल्याने देवीच्या दर्शनासाठी पर्यटक-भाविकांचीही गर्दी होती. अशा परिस्थितीत मंदिरातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत मनोरुग्ण महिलेने घातलेल्या गोंधळाची मंदिर आवारात दिवसभर चर्चा सुरू होती.

Scroll to Top