जोतिबा / प्रतिनिधी
दुसऱ्या पाकाळणीला भाविकांची जोतिबा डोंगरावर मोठी गर्दी झाली होती. लाखो भाविकांनी जोतिबा चे दर्शन घेतले. रात्री दहा पासुनच स्थानिक पुजारी मंदिर स्वच्छतेस सुरुवात केली. सोमवारी पाकाळणी निमित्त पहाटे ४ ते दुपारी ३ पर्यंत जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद असणार असून मंगळवारी महाप्रसादाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे .
श्री. क्षेत्र जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाचा दुसरा रविवार पाकाळणी निमित्त भाविकांची दर्शनासाठी जोतिबा मंदिरात मोठी गर्दी केली होती. सकाळी अभिषेक महापूजा धुपारती सोहळा झाला. मंदिरा सभोवती दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळ पासूनच मंदिरा बाहेरील पश्चिम दरवाजाबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून चांगभलं चा गजर केला. १२एप्रिल रोजी चैत्र यात्रा संपन्न झाली. ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालंकृत खडी पूजा बांधण्यात आली होती. मंदिर स्वच्छतेची सुरुवात पालखी सोहळ्या नंतर रात्री १० पासुन करण्यात आली . मंदिरात साठलेला गुलाल, खोबरे तुकडे नारळ शेंडी गोळा करून मंदिर परिसर रात्री उशिरा पर्यंत स्वच्छ केला.
यामध्ये जोतिबा डोंगरा वरील समस्त पुजारी वर्ग सहभागी झाल्याचे पुजारी देवराज मिटके यांनी सांगितले. सोमवारी २८ एप्रिल रोजी नित्य पारंपारिक पद्धतीने देवस्थान समिती, पुजारी, ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थेच्यावतीने पाण्याचे फवारे मारून मंदिर स्वच्छ केले जाणार आहे. मंदिर गाभारा 2 शिखरे, दीपमाळ, देवता कृत्य साहित्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे, तसेच सोमवारी ४ पासून दुपारी तीन पर्यंत दर्शन बंद करण्यात येणार असून यांची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मंगळवार, ता. २९ एप्रिल रोजी ग्रामस्थ पुजारी यांचेवतीने गांव भंडारा होणार असून महाप्रसादाने चैत्र यात्रेची सांगता होणार आहे.

