‘पाटाकडील’कडून विजेतेपदाची हॅट्ट्रिक

हजारो फुटबॉल शौकिनांनी भरलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमवर अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळाचा 2 विरुद्ध 0 अशा गोलफरकाने पराभव करून उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सन 2024-25 च्या फुटबॉल हंगामात सलग तिसरे अजिंक्यपद पटकावून पाटाकडील तालीम संघाने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. विजेत्या पाटाकडीलच्या संघास 1 लाख रुपये व चषक आणि उपविजेत्या शिवाजी तरुण मंडळास 75 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच ‘पाटाकडील’ने आक्रमक पवित्रा घेत आघाडीसाठी खोलवर चढायांचा अवलंब केला. सामन्याच्या दुसर्‍याच मिनिटाला त्यांच्या प्रथमेश हेरेकर याने गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर त्यांच्या ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार मोरे यांच्या संधी वाया गेल्या. यामुळे मध्यंतरापर्यंत पाटाकडील 1-0 असे आघाडीवर होते. उत्तरार्धात 60 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत अन्शीद अली याने गोल नोंदवून ‘पाटाकडील’ला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ‘शिवाजी’कडून गोल फेडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरूच होते. करण चव्हाण-बंदरे, खुर्शीद अली, बसंता सिंग, इंद्रजित चौगुले, योगेश कदम, दर्शन पाटील यांनी लोगापाठ चढाया करत गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, फिनिशिंगचा अभाव आणि ‘पाटाकडील’चा भक्कम बचाव यामुळे अखरेपर्यंत त्यांना एकाही गोलची परतफेड करता आली नाही. यामुळे सामना ‘पाटाकडील’ने 2-0 असा जिंकला.

सामन्यानंतर नेत्रदीपक आतषबाजीत बक्षीस समारंभ झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते व ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण झाले. यावेळी उद्योजक तेज घाटगे, पुष्कराज क्षीरसागर, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिवाजी पाटील, भाऊ घोडके, तालमीचे अध्यक्ष रामदास काटकर, दीपक काटकर, रणजित खांडेकर, दीपक बराले यांच्यासह ‘केएसए’चे पदाधिकारी, तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन फुटबॉल निवेदक विजय साळोखे यांनी केले.

खेळाडूंतील हाणामारीमुळे मैदानात वातावरण तंग झाले होते. यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी संयोजकांना साऊंड सिस्टीम न वाजवता बक्षीस वितरण करण्याच्या सूचना दिल्या. तरीही काही हुल्लडबाजांकडून ए साऊंड सिस्टीम लाव… अशी तंबी दिली जात होती. मात्र, संयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले. स्पर्धेतील मालिकावीर, फॉरवर्ड, हाफ, डिफेन्स, गोली ही वैयक्तिक बक्षिसे नंतर देण्यात येतील, असे संयोजकांनी जाहीर केले.

मैदानात खेळाडूतील हाणामारीनंतर वातावरण चांगलेच तणाव पूर्ण बनले होते. प्रेक्षक गॅलरीतील हुल्लडबाजीला ऊत आला होता. पोलिसांकडून व्हिडीओ कॅमेरातून शूटिंग सुरू असतानाही काही हुल्लडबाज बिनधास्त शिव्या देत होते. यामुळे या हुल्लडबाजांवर पोलिस कारवाई करणार का? याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सामना संपण्यास पाच मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना भिडले. खेळाडूंसोबत संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. अखेर पोलिस, पंच व संयोजकांनी मैदानात धाव घेतली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे सामना सुमारे आर्धा तास थांबला होता. हाणामारी करणार्‍या दोन्ही संघांतील एकूण 11 खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षकांवर पंचांनी रेड कार्डची कारवाई केली. यामुळे उर्वरित सामना 7-7 खेळाडूंनी खेळला.

Scroll to Top