मिरवणुकीत अश्लिल नृत्यप्रकरणी महिलेसह १५ जणांवर गुन्हा

इचलकरंजी / प्रतिनिधी

बेंदूर सणानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटात सार्वजनिक ठिकाणी अश्लिल हावभाव करत नाचणाऱ्या व वाहतूकीस अडथळा निर्माण करत पोलिसांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात एका महिलेसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो.नि. बाजीराव शहाजी पोवार यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिलेसह राहुल योगेश चावरे, प्रथमेश विनायक गायकवाड, आदित्य दादासो शेळके, सागर लक्ष्मण तोरे, सुरज वसंत बन्ने, संकेत सुनिल नाकार्डे, अंकुश हुल्लोळी, सलमान नदाफ, विशाल देसाई, सुधीर मडिवाळ, अविनाश पडीयार, श्रेयश जोशी धीरज मगदूम व तेजस करणे यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बेंदुर सणानिमित्त गुरुवारी रात्रीच्या सुमारास शंभु बैल ग्रुपचा अध्यक्ष राहुल चावरे व बैलमालक प्रथमेश गायकवाड हे मिरवणूक काढत होते. नदीवेस नाका येथून झेंडा चौक येथे मिरवणूक आली.
मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच १० एच १९४९) मध्ये डॉल्बी मालक आदित्य शेळके (रा. बागणी ता. वाळवा) हा डॉल्बी व लाईट इफेक्टस् लावून गाण्याच्या तालावर एक महिला ट्रॅक्टरच्या इंजिनवर उभारुन अश्लिल हावभाव व असभ्य वर्तन करत नाचत होती. तर तिच्याकडे पाहून उपरोक्त संशयित हे सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करत नाचत होते. या संदर्भात पोलिसांनी त्यांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत सर्वजण नाचत वाहतूकीला अडथळा होईल अशी कृती करत असल्याने गावभाग पोलिसांनी सरकार पक्षातर्फे या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

Scroll to Top