रांगोळी/ प्रतिनिधी
चार दशकांपेक्षा अधिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकातच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा कृती समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सन १९८३ सालापासून हुलगेश्वरी रोड परिसरातील चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण झालेले आहे. या परिसरातील शिवभक्तांनी वेळोवेळी इचलकरंजी नगरपालिकेकडे, तसेच शासनाकडे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या चौकात उभारावा, अशी मागणी केली आहे. तर नुकताच शासनाने या चौकाऐवजी कॉ. के. एल. मलाबादे चौकात महाराजांचा पुतळा उभारण्यास मंजुरी दिल्याने छत्रपती संभाजी महाराज चौकातसुद्धा पुतळा उभारावा, ही मागणी जोर धरू लागली आहे. याचाच भाग म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या मागणीला राजकीय व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन पाठिंबा दिला. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, डॉ. राहुल आवाडे, निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, मदन कारंडे, पै. अमृत भोसले, स्मिता तेलनाडे, मलकारी लवटे, धनाजी मोरे, प्रकाश मोरबाळे, शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते.