किसन वीर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

वाई/प्रतिनिधी

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, भारताचे राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी तसेच अध्यक्ष म्हणून महाविद्यालाययाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी कार्याक्रमचे संयोजक प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, उपप्राचार्य डॉ. हनुमंतराव कणसे, प्रा. भीमराव पटकुरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाचन प्रेरणा दिनाचे महत्व सांगताना डॉ. चौधरी म्हणाले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. त्यांचे एकूण जीवन व लेखन हे सर्वाना स्फूर्ती देणारे होते. वाचनाने मनाची मशागत होऊन स्मरणशक्ती वाढते. वाचनासाठी कोणत्याही विषयाचे बंधन नसून, सर्व प्रकारच्या चांगल्या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. वाचनाने ज्ञानसंपन्न व समृद्ध समाज निर्माण होतो. शिक्षकांनी क्रमिक पुस्तकांबरोबरच संदर्भ ग्रंथाचे वाचन केल्यास अध्यापन परिणामकारक होते. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व हे प्रासंगिक न राहता, वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. फगरे यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून देत, मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त वाचन व लेखन केले पाहिजे असे सांगितले. वाचनाने चांगला व वाईटामधील फरक कळून, व्यक्तीची चिकित्सक दृष्टी वाढीस लागते. आपण ज्या चांगल्या गोष्टी वाचतो, त्याचा जीवनात अवलंब करून आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे वाचन प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी केले व सर्वाना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे व डॉ. संदीप वाटेगावकर यांनी जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळविल्याबद्दल व ‘कृष्णाई’ या महाविद्यालयाच्या नियतकालिकाला शिवाजी विद्यापीठाची एकूण ५ बक्षिसे मिळाल्याबद्दल सहसंपादक डॉ. बाळकृष्ण मागाडे यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी ग्रंथालयातील ग्रंथ आपल्या सर्वांची वाट पाहत असतात, आपण सर्वजण ग्रंथालयात येऊन समृद्ध ग्रंथसंपदेचे वाचन करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. धनंजय निंबाळकर यांनी आभार मानले, श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, कार्यालयीन अधीक्षक श्री. बाळासाहेब टेमकर, प्रशासकीय कर्मचारी व सेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Scroll to Top