कोल्हापूर / प्रतिनिधी
गेले दोन दिवस कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असून गुरुवारी मात्र, पावसाने पहाटेपासून सुरुवात केली. दुपारच्या काळात पाऊस थोडा उघडला. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पुन्हा विजांच्या प्रचंड कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पावसाने कोल्हापूरला अक्षरशः झोडपून काढले.
शहरातील सर्वच रस्ते जलमय बनले होते, नाले, गटारीमध्ये पाणी न मावल्याने ते रस्त्यावर आले. जवळपास गुडघाभरापेक्षा जास्त पाणी रस्त्यावरुन वाहत होते.
सकल भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. अचानक आलेल्या पावसामुळे घरात आलेले पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते, त्यामुळे कोल्हापूरकरांचे फारच हाल झाले. संपूर्ण शहरवासीयांचे जीवन विस्कळीत झाले.
वाहनधारकांना रस्त्यावरील पाण्यातून कसरत करत गाडी चालवावी लागली. सायंकाळी ४ वाजलेपासून कोल्हापूरात विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली.
शहरातील सखल भागातील दुकानात पाणी शिरले. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र, शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली. जोराच्या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची, दुकानदारांची तसेच ऑफिस सुटण्याच्या वेळेस पाऊस सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांची मात्र त्रेधात्रीपट उडाली.
दरम्यान महापालिकेने रस्ते, परिख पुल, खानविलकर पेट्रोलपंप यासह शहरातील अनेक रस्त्यांवरील व पुलांमध्ये साठलेले पाणी व कचरा काढण्याची मोहिम युध्दपातळीवर राबविली. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

